Wednesday, 1 April 2015

वजन कमी करण्यासाठी

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्यकरते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे.प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षणहोते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.

१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.

२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्यासाखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.

३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.

४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.

५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.

६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.

७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचेरूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.

८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.

९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.

१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.

११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.

१२) जस्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.

१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतरभात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.

१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेकमतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.

१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारेसिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.

१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवानियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.

१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायामकरावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठेजमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठीजी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.

-डॉ. अंकुश पवार

No comments:

Post a Comment